Thursday, 5 November 2015

मन

मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग

मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता

मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले

मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता

मन कणखर किती , सावटाची दाटे  भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि  नाती

मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू   धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ

मन एकाकी कधी अन  कधी सामावे सर्वांसी
रात्र काळोख दाटता,  उजळे प्रकाश चंद्रासी

मन  अवखळ  कधी,  अन कधी क्रोधात कोपता
मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता

न कळले हे मन , न माझे न तुझे
मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे

कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे
कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे

कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद
वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद

जर कधी लागलच ठाव,  या उनाड मनाचा
उरे काय अर्थ  ह्या जगण्याचा

बरे आहे ,  हे असेच , काही कोडी न सुटतात
रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात

मन कोणासी कळले , भले भले  हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले

मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल
मानसी बोलता स्वतःच्या, कळे  मनाचे  हे मोल

नको उत्तर शोधूं या, या मनाच्या  प्रश्नाचे
तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे

-शीतल














लहान पण देगा देवा !!!!

लहान पण देगा देवा !!!!


किती वर्षे झाली, दप्तर भरले नाही
किती दिवस झाले मधली सुट्टी पण मिळाली नाही
लहान सुट्टी मध्ये डबा संपून, मोठ्या सुट्टीमध्ये लगोरी पण लावली नाही
बरेच दिवस झालेत, प्राथर्ना म्हणण्यासाठी  हात जोडून
अन प्रतिज्ञा तर आता केवळ आठवणी मधेच राहिलेय
मागे वळून पाहताना थोडे, शाळेची घन्टा ऐकू येतीये
आता शाळा भरेल असे वाटे पर्यंत  आठवणीची रेती हातामधून निसटून जातीये
घरचा अभ्यास आणि गृहपाठ नावाचा एक छळवाद होता
तरी सुद्धा प्रत्येक दिवस किती आनंदात जात होता
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण सुख सापडत होते
आणि जगण्यासाठी आपले गणगोत आणि सुहृद पुरेसे आहेत ह्याचे हि कौतुक होते
खेळत  लबाडी केली तरी, मैत्री मध्ये निरागसता होती
अगदी एक cadboury  सुद्धा सात जणांमध्ये पुरत होती
आपल्या बालपण मध्ये , आई वडील त्यांचे बालपण शोधत होते
"मला जे नाही मिळाले, ते तुम्हाला मिळू दे" , या साठीच झगडत होते
बघता बघत , बालवाडी संपली, प्राथमिक , माध्यमिक अन महविद्यालय पण झाले
इतक्या वर्षात, खरच  कधी मागे वळून सुद्धा नाही पहिले
तरी आज  पुन्हा भूतकाळात डोकावताना,
शाळेची इमारत अजून हि आठवतीय, मित्र-मैत्रिणीच्या घोळक्यात खिदळणारे आपण हि दिसतोय  हसताना
ज्या वळणावर सगळ्यांच्या वाटा निराळ्या झाल्या, तिथेच मन अडकून राहलय अजून हि मागे वळून पाहताना
छान होते बालपण माझे,  आई बाबा, भाऊ बहिण सगळ्यासाठी वेळ होता
शाळा, मित्र मैत्रिणी, माझे शिक्षक इतके छोटे पण सुंदर जग होते माझे
तसे तर आयुष्य अजून हि सुंदर आहे,  नवे जग, नवी नाती ,  थोडे त्रास हि आहेतच कि
पण तरी सुद्धा जिथे तुकोबाला सुधा ज्या लहानपणचा मोह सुटला नाही, तो आपल्या  तरी का सुटेल
आज परत प्रार्थना म्हणावी लागली, तर लहानपणच मागू आपण
देव असेलच तर म्हणेल अरे मी पण नाही का बाळकृष्णाचा, गीता सांगणारा कृष्ण झालो
नियती आणि वेळ कधीच चुकत नाही आणि कुणासाठीच थांबत नाही
म्हणूनच कदाचित, साठवण हि  बालपणाची जपू शकतो आपण
थोडे निरागसतेने आयुष्याकडे पाहू या पुन्हा
अन साठवू यात मनात आपल्या बालपणाची  आठवण

-शीतल











पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय



पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय


आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय
अन आठवणीच्या  मेघांनी आभाळ पुन्हा दाटतय
थोडे रुसवे थोडे भांडण थोडी समजूत आणि खूप सारे प्रेम
पुन्हा मनात साठवावं  असे वाटतय,
खरच आज  पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय

जुने झालाय प्रेम थोडे आणि आपण हि जुनेच झालोय आता
एकमेकांच्या मनातले पक्के ओळखू लागलोय आता
कोणत्या वाक्यावर तो  वैतागणार तिला   आहे नक्की ठावूक
आणि त्याला आता जमू लागलय सावरणे तिला, जेव्हा ती होते अगदी भावूक
तरीसुद्धा, पुन्हा एकदा  नव्याने भेटावे असे  वाटतय
खरच आज  पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय

जुने  ते सोने म्हणतोच कि आपण
वेळ जाईल तसे दृढ होते नाते अस मानतोच कि आपण
वर्षामागून वर्षे सरता, एकमेकासोबत बरच काही पाहतो आपण
प्रेम थोडे मागे पडू, माया जास्त वाटू लागते हे पण जाणतोच कि आपण
तरी सुद्धा,  ऋतू बदलला कि जुन्या झाडाला नवी पालवी फुटतेच कि,
हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतो आपण

म्हणूनच तू मला अन मी तुला गृहीत न धरता
नव्या रंगांमध्ये नवे चित्र रेखाटावे असे वाटतय
खरच आज  पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय

तोच थोडा अवखळपणा, तोच थोडा बालिशपणा
तेच थोडे एकमेकांना मैत्रीच्या नात्याने भेटणे
अन काय आहे तिच्या मनात थोडे चाचपून  पाहणे
त्याला नक्की काय  वाटतंय याचे मनात अंदाज बांधणे
मागे वळून पाहता आता हे सारच गमतीचे वाटतंय
पुन्हा एकदा तेच चांदणे आपल्या मध्ये झिरपावे असे वाटतय
आणि म्हणूनच आज  पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे  वाटतंय

-शीतल







सहजच लिहिता लिहिता


सहजच  लिहिता लिहिता

सहजच  लिहिता लिहिता
शब्दांचे  काव्य जाहले
असेच गुणगुणताना
कवितेतून गीत पाझरले

शब्द तेच होते ओठी
अन मी हि तीच होते
तुझ्याशी जुळता रेशीम गाठी
त्याच शब्दांना नवे अर्थ लाभले

सगळे काही तेच आहे
तरी सारेच नवे भासते
सृष्टी जरी एकच  जरी
तरी नव्या ऋतूचे  रूप ल्याते

कसली तरी किमया होते खरी
अन हुरहूर अनामिक दाटे उरी
प्रीतीने मन आभाळ भरून येता
मायेच्या हळव्या सरीवर सरी

सहजच आयुष्य जगता जगता
आयुष्याचे नव्याने अर्थ कळाले
सहजच वाटे वरून मार्ग क्रमिता
सुहृदाचे प्रेम गवसले

-शीतल

कृष्ण सखा





कृष्ण सखा

मीरेचा तू कृष्ण सखा, तर आणीकही कुणासाठी  भगवान तू
देवकीचा कान्हा तर राधेचा मनमोहन तू
पण कोणी कधीच न वदले, मज, रूक्मिणी  साठी आहेस कोण तू

मग स्वये रुक्मिणीच वदे, कि माझ्यासाठी कोण तू ,.............

माझ्यासाठी तर ......

चिंब करणारा आषाढाचा, पहिला वहिला मेघ तू
लखलखणारी विजेची तेजोमय  रेघ तू
किनाऱ्यावर झेपावणारी बेधुंद सागर लाट तू
घनगंभीर काळोखातील रविकिरणाची वाट तू

रिमझिम रिमझिम श्रावण सरीमधील गारवा तू
मनमुक्त गाणाऱ्या कोकिल तानेतील मारवा तू
तप्त रेतीमधील मृगजळाचा भास तू
क्षितीज्या पल्याडच्या स्वर्ग सुखच आभास तू

राधेचा जिवलग सखा अन मीरेचा ध्यास तू
रूक्मिणी  साठी  मात्र क्षण अन क्षणाचा श्वास तू

- शीतल जोशी










सोनेरी कवडसा: सोनेरी कवडसा आणि मी (Working woman) : एक संवाद

सोनेरी कवडसा एक डोकावला खिडकीतून
जणू म्हणाला मला, चल आटप लवकर
सूर्याचा निरोप  घेण्याची वेळ झालीय आता
अन तुझ्या ऑफिस मधले सगळेच जातील निघून पाहता पाहता

थोडेसे लवकर निघून बघ तरी बाहेर
किती मस्त संधिकाल  आहे आहे उभा
हळू हळू झुकेल सूर्य पश्चीमेकडे
अन मस्त आभा पसरेल  नभामध्ये
किती दिवस झाले तुला असा सूर्यास्त पाहून
अन किती दिवसे झाले तुला चंद्र्शी हितगुज करून

कधी तरी वेळ काढ कि स्वतःसाठी अन माझ्या साठी सुद्धा
तुझ्या लहानपणी मी यायचो  असाच तुझ्या घरात डोकावायला
सकाळी सकाळी तुला झोपेतून जागे करायला
कदाचित नसेन आवडत मी तुला तेव्हा, झोप मोड होते म्हणून
आणि कधी कधी आवडत हि असेन सकाळी आपो आपाच जाग  येते म्हणून
सणवार असले कि नव्या झगमगीत कपड्यावर मी  अलगद येवून परावर्तीत झालो कि
कित्ती छान आणि उल्हासीत वाटत  असेल ना, अगदी  आनंद सोनेरी झाल्यासारखा
आणि कधी तरी मी डोकावायचो असाच संध्याकाळी, आणि पाहायचो तुला
तू असायचीच तुझ्या भाव विश्वात रममाण, कधी पुस्तकात शिरलेली
कधी गप्पात रमलेली अन कधी कधी स्वतः मधेच हरवलेली,

पण आता  तुझ्या घरात डोकावणे, अशक्यच  झालंय
खिडक्या असतात बंद, आणि असल्याच जरी उघडलेल्या
तरी सुद्धा रंगबेरंगी पडद्यांनी सजवलेल्या

सकाळ होते ते कळते तुला, पण आता माझ्याशी नाही तर घड्याळयाशी  नाते जमलाय तुझे

अन दिवसा मागून दिवस गेले तरी, एखादा तरी  कवडसा भेटतो  का ग संधीप्रकाशाचा  घरी किंवा ऑफिसे मध्ये तरी

कधी तरी बाहेर पड  या सगळ्यातून अन भेट मला, कधी तरी कोवळ्या सकाळी अन कधी तरी   कोमेजाणाऱ्या संध्याकाळी
.
कधी तरी रागाव माझ्या वर झोप मोडली म्हणून आणि कधी तरी म्हण किती "मस्त दिसतंय ना सोनेरी सोनेरी सगळे ह्या सोनेरी कवड्श्यामुळे'

त्या निमित्ताने  तरी बोल माझ्याशी अन कधी तरी डोकावून बघ स्वतःच्या मनात
.कदाचित माझ्या रूपाने तुझे अतरंग च बोलत असेल तुझ्याशी अन माझ्या सारखीच तुझ्या भेटी साठी असुससले असेल कुणातरी, कुठे तरी , कदाचित तुझे आई -वडील, भाऊ-बहिण , एखादा जिवलग सखा किंवा जीव भावीची मैत्रीण

भेट एकदा तरी  त्यांना आणि मला अन वाटून टाक थोडा वेळ आणि खूप  सारा आनंद
सोनेरी प्रकाशामध्ये उजळून जावू दे तुझे मन, विचार आणि आयुष्य सुद्धा. परत एकदा प्रयत्न तरी कर माझ्याशी, निसर्गाशी सवांद साधण्याचा अन मग उमगेल तुझे तुलाच कि किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद दडलाय. मावळतीला होणारी रंगांची उधळण , सकाळचा सोनेरी प्रकाश, आणि खूप उन्हातून दमून आल्यावर थंडगार पाण्याचा एक घोट सुद्धा आनंद देतो, हे सापडेल तुझे तुलाच आनंद परत एकदा

--- शीतल







तुझे माझे नाते


तुझे माझे नाते

बावरलेली मी अन सावरणारा तू
स्वतःलाच हरवून बसलेली मी
अन मलाच माझा शोध लावून देणारा तू

सदाचीच  भविष्यात  रमणारी मी अन
भविष्य साठी वर्तमानात झगडणारा तू

तुझ्यात माझे अस्तीस्त्व सामावून टाकणारी मी
अन माझी अस्मिता  माझ्यासाठीच जपणारा तू

तुझ्या शिवाय नाही जगत येणारा असा विचार करणारी मी
अन  केवळ एकमेकासोबत जगायचा असा विश्वास बाळगणारा तू

तू जवळ नसताना सुद्धा तुझ्या डोळ्यांच्या आठवणी मध्ये रममाण मी
अन मी समोर असताना माझे मन माझ्या डोळ्यात वाचणारा तू

ज्या वेळी कोसळलेली  मी, त्या  क्षणी सांभाळणारा तू
ज्या क्षणी कमजोर तू,  त्या क्षणी खंबीर मी

तुझे माझे नाते कधी उसळणाऱ्या सागरसारखे
तुझे माझे नाते कधी संथ, शांत सरिते सारखे
- शीतल जोशी 

सूर जगलो मी



सूर जगलो मी

सूर जगलो मी , सुरेल झाले श्वास हि माझे
सप्तसुरांचा नादब्रम्ह साऱ्या विश्वात वाजे

सृष्टी सारी बहरून  जाई  अन
वसंत सुरांनी मोहरूनी   गाई

आला  हा वसंत सुरांचा
जणू अंश हा शारदेचा

वसुधे वर उतरुनी  आला
रसिका स तृप्त करुनी गेला
 
पंडित वसंत राव देशपांडे यांच्या स्मृतीस वंदन !!!
  - शीतल 

क्षण एक पुरे प्रेमाचा


क्षण एक पुरे  प्रेमाचा!!!!!


क्षण एक पुरे  प्रेमाचा
तुझ्या सवे जगण्याचा

तू तुझ्या विचाराने स्वतंत्र
अन मी माझ्या कोशात रमलेली
तू  तुझ्या आवडीने आयुष्य जगणारा
अन मी माझ्याच मनाचे ऐकणारी
तरी  कसा जुळला हा धागा सुख दुःखाचा
क्षण एक पुरे  प्रेमाचा

किती वेगळे  आपण एकमेकापासून
आणि जगणे हि मनस्वी दोघांचे
तू म्हणशील मस्त पाऊस पडतोय
चल, जरा फिरून येवू
पावसात मस्त भिजून येवू

मी म्हणेन, मस्त पडतोय रे पाऊस
पण किती छान वाटेल ,
जेव्हा पाऊस खिडकी मधून आत यॆइल
आणि मग हातामध्ये एक मस्त कवितेचे पुस्तक
हळुवार रुंजी घालणारे बासरीचे सूर आणि एक कप कॉफी
तू म्हणशील थोडासा वैतागून, घरी काय थांबायचं,
 आणि तसही मला कॉफी आवडत नाही

मग ,
जाऊ आपण भटकत, थोडे से दूर
एक कवितांचे पुस्तक घेवून
पावसाचे  सूर येतील ऐकायला
अन कॉफी नसली तरी एक कटिंग  चहा  असेल प्यायला
असाच असतो शोधायचा आणि जपायचा
आनंद एकमेकांचा
क्षण एक पुरे  प्रेमाचा
मनमुक्त भिजण्याचा
तुझ्या सवे जगण्याचा
क्षण एक पुरे  प्रेमाचा
- शीतल

जुळले हे बंध असे


जुळले हे  बंध असे


का कधी आणि कसे
जुळले हे  बंध असे
क्षण हे मोलाचे
तुझ्या माझ्या प्रेमाचे

कधी मनमुक्त जगण्यचे
अन कधी एकमेकांवर रुसण्याचे
कधी तुझ्या सवे हसण्याचे
अन कधी तुझ्यासवे अश्रू वाटण्याचे

का कधी आणि कसे
जुळले हे  बंध असे
क्षण हे मोलाचे
तुझ्या माझ्या प्रेमाचे

कधी तुझ्यापाशी व्यक्त होण्याचे
अन कधी अव्यक्त भाव समजण्याचे
कधी शब्दांनी बोलण्याचे
अन कधी शब्दाविना कळण्याचे

का कधी आणि कसे
जुळले हे  बंध असे
क्षण हे मोलाचे
तुझ्या माझ्या प्रेमाचे

 हेच क्षण, हेच प्रेम,   आहे  सात जन्माचे
सोबत राहो असेच हे नाते सात पाऊलांचे
- शीतल





पावसाला आज मस्त रंग चढलाय !!!!


पावसाला आज मस्त रंग चढलाय

पावसाला आज मस्त रंग चढलाय
जणू तोही कोणाच्या प्रेमात पडलाय
थोडासा अवखळ , थोडासा बैचैन आणि थोडा  आरस्पानी  झालाय
जणू प्रेयसीच्या आठवणीमध्ये ओला चिंब गहीवरालय

तिच्या एका  भेटीसाठी व्याकूळ  होवून कोसळताना
तिच्या सोबत भिजताना मृदागान्धासम दरवळताना
 बरसणाऱ्या जलधारातून वसुधेला सजवताना
अन सैरभैर मनाचा प्रेम संदेश पोहोचवताना
आज पावूस पुरता भिजलाय,
जणू तोही कोणाच्या प्रेमात पडलाय

पावसाला आज मस्त रंग चढलाय
जणू तोही कोणाच्या प्रेमात पडलाय
थोडासा अवखळ , थोडासा बैचैन आणि थोडा  आरस्पानी  झालाय
जणू प्रेयसीच्या आठवणीमध्ये ओला चिंब गहीवरालय


- शीतल












एक बारीश थी

एक बारीश थी


एक बारीश थी
एक  तुम थे
एक  भीगा भीगासा
हमारा मन भी था

थोडी गीलीसी यादे थी
 थोडी बारीश कि  बुंदे  थी
अब के फिर से वोह बारीश है
तुम हो,  हम है
बस भीगासा मन कही खो गया है
वो गिली यादे  छुप गयी है
वो बुंदे कही बेह गयी है
चलो फिर से बारीश को अपना ले

थोडा फिर से  जी ले  थोडी नयी यादे बना ले
और फिर अगली बारीश का इंतजार कर ले
-शीतल 

अशाच एका सांजवेळी


अशाच एका सांजवेळी

अशाच एका सांजवेळी
 तुझी आठवण  येते
अन मन हरवून जाते

सहज सोपे तुझे बोलणे
निखळ निरागस तुझे हसणे
प्राजक्तासम   फुलून येणे
स्वतः मधेच रमून जाणे
या साऱ्याची स्मृती जागते
अन मन हरवून जाते

सागर लाटा सम  उसळणे
निर्झरा पणे मुक्त वाहणे
पक्षासारखे स्वच्छंद विहरणे
भरभरून आयुष्य जगणे
या साऱ्याची स्मृती जागते
अन मन हरवून जाते

पुन्हा एकदा परत येशील का
पुन्हा एकदा जगणे शिकवशील का
पुन्हा एकदाच साद देशील का
पुन्हा एकदा स्मृती जगवशील का
या विचारांचे काहूर माजते
अन मन हरवून जाते

- शीतल जोशी












तुझ्या माझ्या सवे - पाऊस

तुझ्या माझ्या सवे - पाऊस

अवचित आभाळ भरलेले अन घन हे ओथंबलेले
आठवणीच्या हिंदोळ्यावर  मन हे व्याकुळलेले

एका जुन्या वाटेवरती, एक पाऊल अडखळलेले
त्याच पुन्हा मृद गंधाशी एक नाते जडलेले

पुन्हा एकदा रिमझिमणाऱ्या   पावसानी,  तुला नि मला वेढलेले
पुन्हा एकदा रेशीमधारांनी सप्तसूर छेडलेले

ओल्या चिंब सरींवर एक गीत भिजलेले
तुझ्या - माझ्या प्रीतीचे क्षण सुंदर सजलेले

मेघ दूतांच्या गर्दीमध्ये घननीळ दाटलेले
पावसाचे एक एक थेंब तुझ्या- माझ्या मधे वाटलेले

आयुष्याच्या वाटेवरती  कृष्णमेघ बरसलेले
तुझ्या सवे  आनंदाचे झाड पुन्हा बहरलेले

-शीतल












जगावे कसे?

जगावे कसे?

पावसाला कुठे ठावूक असतं, मी बरसणार आहे म्हणून

कळीला कुठे ठावूक असतं, मी उमलणार आहे म्हणून

आंब्याला कुठे ठावूक असतं, मी मोहोरणार  आहे म्हणून

ऋतूला कुठे ठावूक असतं, मी बहरणार आहे म्हणून

क्षणाला कुठे ठावूक असतं, मी जाणार आहे म्हणून

आयुष्याला  कुठे ठावूक असतं, मी संपणार  आहे म्हणून

म्हणूनच
अगदी मनापासून  उमलावं
अगदी मनापासून बहरावं
अगदी मनापासून जगावं
असं आयुष्य जगावं  कि
कधीतरी संपणारया आयुष्यालाही
जगण्याचा मोह पडावा
प्रत्येक क्षणावर प्रेम करण्या इतका
आयुष्याचा आपल्याशी स्नेह जडावा

- शीतल जोशी






Wednesday, 4 November 2015

"चैत्र"

"चैत्र"

आणिक एकदा चैत्र बहरला
थोडा आवरला थोडा सावरला
त्याच जुन्या वाटेवरती
पुन्हा गुलमोहोर फुलून आला
पुन्हाएकदा झाडांवरती चैत्र पालवी मोहरून आली
सृष्टी जणू  एक नवीन  रूप ल्याली

वैशाख वणव्या पूर्वीचा  चैत्र
उंच उंच गुढीचा चैत्र
साखर माळेचा मधुर चैत्र
नव्या वर्षाच्या आशेचा चैत्र
नव्याने बहरलेल्या पालवीचा  चैत्र
कोकीळ सादेने मंत्र मुग्ध चैत्र
आम्र वृक्ष मोहोरलेला चैत्र
गुलमोहोर बहरलेला चैत्र
जुन्या आठवणीचा चैत्र
नव्या गाठी भेटीचा चैत्र

पुन्हा एकदा बहरला चैत्र
सृष्टीच्या नवचैतन्याचा मैत्र

- शीतल जोशी

जीवनगाणे




जीवनगाणे

जगायचं जगायचं म्हणजे काय करायचं,
उत्तर अगदी सोपे आहे, हसत हसत  गाणं म्हणायचं

आपलेच सूर आपलेच ताल
आपलेच शब्द आपलीच चाल
कधी कधी सूर ही तालाबरोबर नाचतात
आपलेच शब्द आपल्याकडे बघून खुदकन हसतात

अशावेळी आपणही मनापासून हसावं
आपलं सुख आठवणींच्या कुपीत जपावं

कधी कधी मात्र  सूर तालाची साथ सोडून जातात
आपल्याच चाली, आपलेच शब्द अनोळखी भासू लागतात

अशावेळी कधीच खचून नसत जायचं
कुपीत जपून ठेवलेलं सुख असतं प्यायचं

अशा संस्मरणीय ग्प्शितच अखेर पर्यंत सोबत करतात
किती ही अंधार असला तरी प्रकाशापर्यंत खेचून नेतात

आपली मैत्री  सुद्धा असेल अश्याच  एका कुपीत
संकटावर मात करण्याचे हेच अनमोल  गुपित

अशाच एका बंधनात आपले सूर जुळतील
शादासोबत ताल सुद्धा एकमेकात गुंफतील

जीवनाच्या  गाण्याची अशीच सुंदर कथा असते
मनापासून जगलं की कसलीच व्यथा नसते


- शीतल जोशी



प्रश्न ?


प्रश्न ?

प्रश्न आहे कि अखेर पर्यंत सोबत कुणाची
उत्तर  अगदी सोपे आहे  प्रश्नाशिवाय आणखी कुणाची

प्रत्येक पावलावर
प्रत्येक प्रश्नाचा  थाटाच निराळा
प्रश्न  नाहीच  असा क्षणच विरळा
प्रश्न  प्रत्येक मनात आहे
प्रश्न  प्रत्येक क्षणात आहे

प्रश्न प्रत्येक वाटेवर आहे
प्रशन प्रत्येक लाटेवर आहे
कधी कधी वाटते कि
प्रश्न हि एक सजा आहे
पण प्रश्नाशिवाय
आयुष्यात तरी काय मजा आहे

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधताना
स्वतःला पण हरवून बसावं
जवळच असणारे उत्तर पण
का इतकं लांब भासावं?

एकाच प्रश्नाचं पण उत्तरं हजार
या प्रश्नोत्तराच्या घोटाळ्यात कितीही जरी झालो बेजार
तरी सुद्धा प्रश्न हि काही सजा नाही
प्रश्नांशिवाय खरच आयुष्यात काही सुद्धा मजा नाही

- शीतल जोशी















अनुराग

अनुराग


निशिगंध दरवळेल, माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल
पावसात चिंब ओला होशील, माझे पाणावलेले  डोळे दिसतील

आकाशातून चंद्र खुणावेल, अन माझ्या श्वासातील शीतलता आठवेल
कोसळणारा निर्झर  पाहशील माझ्या मनमुक्त जगण्याचे क्षण भेटतील

सागर किनाऱ्यावर लाटा झेलत थांबला असशील,
माझ्या आठवणीची अमृत धारा बरसल्याचा  भास होईल

रात्री कूस बदलून डोळे मिटशील,
पापण्यावर  हळुवार रुंजी घालणारे माझे स्वप्न कसे  दूर करशील

स्वप्नामधून अलगद डोळे उघडतील
अन   तुझा असा तू कितीसा उरशील

रुसवे फुगवे तर आहेतच  रे  प्रेमामधे  
 असा कितीसा  अंतर राखून   राहशील

आयुष्याचा प्रत्येक पावलांवर,
 मला तुझ्या सोबत  पाहशील

-शीतल जोशी

एक रात्र पावसाची


एक रात्र पावसाची



एक रात्र पावसाची अन एक प्रवास मैत्रीचा
एकमेकासोबत चिंब भिजून भेटण्याचा
एक भेट अविस्मरणीय , एक गोष्ट डोळ्यांची
एक क्षण हरवलेला अन एक क्षण भारावलेला

एक ओळख हरवलेली अन एक नवी ओळख पटलेली
एक रात्र कधी ही न संपणारी, अन एक पाउस कधीच न थांबणारा
एक क्षण, एक प्रवास संपण्याची हुरहूर अन हळूच एका नव्या प्रवासाची चाहूल
एक अनामिक दाटलेली हुरहूर  अन   दोन डोळ्यात दाटल्येल्या अश्रूंची  मनास पडली भूल

एक नाते विश्वासाचे अन एक बंधन आयुष्याचे
एक पाउस तू , मला अन सागराला ही चिंब करणारा
अन एक पाउस दोघांच्या ही मनात सदाच बरसात गाणारा


- शीतल जोशी

सप्तपदी


सप्तपदी

व्यक्त अव्यक्त स्पंदने हृदयात,
 मनातली प्रीती उमटे नयनात
माझे जगणे तुझ्या श्वासात,
 कळ्या जशा पहाटेच्या दवात
माझे अस्तित्व तसच तुझ्या मखमली स्वप्नात
अनामिक ओढ हि जणू  एका अबोल  अश्या बंधात
आयुष्याच्या हि पलीकडली साथ ही
सप्तपदीच्या पाउल खुणात

- शीतल जोशी

खिडकी

रोज  मुझ से बहार झाकते हो , कभी मुझ मे भी झाककर देख लो
क्यो, ?, नही पेहचान मुझे मे  कौन हु
मै तो वो छोटासा जरिया हु, नजरिया हु ,
मुझ से अगर झाको तो आसमान भी  मुठ्ठीभर लगता है
कोई मुझे झरोका कहता है, कोई खिडकी
आजकाल तो मुझे विंडो भी कहते है ,
जिस से पुरे दुनिया कि सैर  होती है

हमेशा मैने तुम्हारी आंखो से दुनिया देखी ही,
आज मै तुम्हे  मेरे अंदर कि दुनिया दिखती हु

की साल हो गये , सामने एक गुल मोहर का पेड था
और एक चिडिया आपण घोसला वाह पे बनाती थी
वाह घोसले मी एक नंही चिडिया थी
और यहा  घर मे भी
दोनो जगह वही चहल पहल
वही सारी खुशिया थी
एक दिन नंही चिडिया को  पंख  मिले और वो उड गयी
और घर भी कुछ खाली खाली हो गया, गुलमोहोर कि पेड कि तरह सुना सुना
आज भी  मुझ से दो आंखे झाकती है, थडी धुंदली सी याडो कि तरह
किसे के इंतजार मे , शायद अपनी नंही चिडिया के,
मै वही इंतजार हु

मै वो भी  इंतजार हु,
जब खिडकी मे से कोई अखियो  के झरोके से
झाकता था
और मन हि मन मन मे  मुस्कुरता था
प्यार के उस  बंधन कि  मै गवाह हु

मै तो वो भी गवाह हु
जिस ने एक एकेली जान को
अकलेपन कि इंतीहा देखी है
जीवन कि हर एक धूप छाव देखी है

-शीतल












जर मागे वळून पाहताना

जर मागे वळून पाहताना
थोडे अंतर्मुख होताना
चांगल्या वाईट , काही स्मृती
मनामध्ये  जागताना

बालपणीचा काळ सुखाचा
हे बालपणी न गमले
अन भविष्याची स्वप्ने रेखताना
बालपण हि सरले

ममतेचे छत्र होते
अन सावरणारे कणखर  हात होते
म्हणूनच , केवळ आनंदाचे झाड बहरले
अन दुःखाची झळ न  पोहचली मजपाशी

स्वत्वाची झिंग जी चढली
अन यशाची व्याख्या हि कळली
तुटले बंद मायेचे , ममतेचे पाश हि तोडले
जगण्यची उन्मत्त धुंदी
ते सारे ऋण विसरली

मज वाटे मन माझे कणखर
म्हणुनी पाश हे तुटले
मज  तमा काय कुणाची
माझे मी पण मीच घडवले

जे वाटे यश मिळाले
ते फोल आहे सारे
अन ज्याला मी म्हणतो तत्व माझे
त्याचे अस्तित्व नाही उरले

जगण्याची  मध्यान झाली
अन  जग मनाला आली
पण आता पाहता मागे
सारी वळणे मागेच  उरली

वर उंच उंच जाताना
खाली सारेच लहान भासे
सारे आयुष्य पणाला लावून
टाकले नशिबाचे फासे

स्वतःसाठी जगता जगता
थोडे विसरलो जगण्याचे भान
कितीही मिळाले सुख तरीही
सुकली नाही तहान

जीवन ज्यांनी देवू केले
अन जगण्यासही मज शिकवले
त्यांची  साथ सोडून देताना
मज जराही न  उमगले

कि मार्ग जरी हा सोपा
अन दिसतो हि  राजसा मोठा
तरी सोबतीस नाही कुणी
अन सारा हिशोब झाला उलटा

जगण्याचे गणित मांडले
हेच काय उणे ते केले
बेरीज करता सारी
हाती काही न उरले

झाल्या काही चुका हि
आता वेळ हि निघून गेली
क्षमा मागायची तरीही
आता आस पास हि न दिसे कोणी

जर मागे वळून पाहताना
थोडे अंतर्मुख होताना
चांगल्या वाईट , काही स्मृती
मनामध्ये  जागताना

-शीतल