Wednesday, 13 February 2019

धर्म

धर्म


इरा किती तरी वेळ चहाचा कप हातात घेऊन उभीच होती. आज पेपर ही वाचला नाही. रविवार असल्याने सकाळही निवांतच होती. पण इराचे हे तंद्री लावून उभे राहणे वेगळं होते. 

दोन दिवसांपूर्वीच सलीलचे अमेरिकेला जायचे ठरले होते. कदाचित त्याचे आधीच ठरले असेल, पण इराला आणि इतर लोकांना आता कळले होते इतकंच. 

खरं तर तिने इतका विचार केलाच नव्हता काल पर्यंत. तसाही फक्त सहाच महिन्यासाठी जातोय ना, अशी एक सार्वजनिक प्रतिक्रिया होती.

माई तर लगेच म्हणाल्या " चांगले आहे की. संधी अनायासे मिळाली आहे. इराला सुट्टी मिळत असेल तर घेऊन जा. तिला ही एक नवीन देश पाहायला मिळेल.आणि आमचे काय, आम्ही तसे जाऊन येऊनच असतो."

खरं तर माई फक्त प्रतिनिधित्व करत होत्या, इतर जवळच्या व्यक्तींना पण असच वाटत होते.  त्यातून ही तरुण जोडप्याने शक्यतो एकत्र राहावा असा एक विषय ही त्यात होताच. पण तसे एकमेकांच्या  तोंडावर बोलणे, कोणाच्याही पचनी पडण्याच्या पालिकडच होते.इतके साधे सोपे आहे  सगळे  तर मग आपल्याला उगाचच असे थोडे उदास आणि तुटल्यासारखे का वाटतय?

सलीलाला संधी मिळाली हे उत्तमच आहे. आता राहता राहिला प्रश्न मी जायचे की नाही त्याचा,  तर ते मलाच ठरवायचे आहे. कारण सलील याबद्दल काहीच बोलला नाही आहे. तटस्थ आहे का तो? की त्याला त्याचे मत सांगायचे नाहीये.

इतक्यात दारावरची बेल वाजली आणि इराला विचारातून बाहेर पडणे भाग पडले . रखमाच असेल या वेळी. 

शनिवार - रविवारच रखमाची आणि इराची भेट व्हायची. काम करता करता गप्पा पण व्हायच्या. रखमा ने खचितच चार पावसाळे अधिक पाहिले होते इरापेक्षा. ती ज्या वातावरणात जगात होती तेही खूप भिन्न होते, इराच्या घरापेक्षा , कुटुंबापेक्षा. पण दोघी ही मस्त गप्पा मारायच्या.

"काय ताई अजून चहाच का ? रविवार हाय म्हणून काय झाले, आवरा की चटचटा"

"हो बाई, उशीरच झाला बघ. तू घेशील का चहा घोटभर. ताजाच करते दोघी साठी"

असे म्हणून इरानी आदण ठेवले सुद्धा. राखमाला उगाचच मनात आले, कशाला हवा ताजा चहा, उगाच कशाला वाया घालवायचे दूध, चहा , साखर. 

"इरा ताई, तोच च्या गरम करून घेवू की घोटघोट भर."

"काही नको, एक कप चहानी काही माझी इस्टेट वाया जात नाहीये. तू पण आता माई आणिआई सारखे नको बाई सांगू."

इरा ऐकणार थोडीच होती.

चहा पिता पिता, रखमा म्हणाली, 

"ताई, मधे माई म्हणत व्ह्यता की जादाच काम हाय काई तरी.काई असलं तर सांगा की करून देईन. वाईच पैशाची पन नड आलिया."

"अग हो, आहे खरे थोडे साफ सफाईचे काम. करून देशील का तुझ्या सवडीने. आणि रोज तासभर जादा काढशील तर बारीक सारीक कामात मदतच होईल मला. ठरवू आपण आजच. पैसे हवे असले तर सांग देईन की मी तुला. पगारातून वळते होतील. पण काय ग, काय झाले अचानक, पोरं बाळ बरी आहेत ना"

इराला आता उगाच आठवले , सलीलचे असे म्हणणे होते की इराला व्यवहार काही कळत नाही आणि म्हणून लोक तिच्या डोक्यावर बसतात. 

रखमा बोलत होती,

"काय सांगायचं इरा ताई. आमच काय एक संपल की दुसरं. आता त्यो माझा नवरा , महिन्याला सात आठ हजार रुपये मिळवायचा. पाच तरी खर्चाला उपेगाला यायचं. 10 दिस झाले घरीच बसून हाय. असच इक दिस काम सोडून आला. अन बसलाय आता घरी. काम धंदा बी शोधना. निस्ता बसून हाय. बरं काम सोडणार तर मला काय सांगितलं बी न्हाय. आला असंच सोडून . तरी एक हाय की दारू पिणं जरा कमी हाय. मदी एकदा पोलिसाने धरून नेला व्हता , त्या वकती मी  त्याला आणलाच नाय माघारी, राहिना म्हटल महिनाभर तितच जेलमदी. त्या दिसापसने जरा बर हाय बगा. काय करायचं ताई, आमच्या लोकात हे असंच चालतय बगा, सगळं बायांनीच करायचं. पर कुंकवाला धनी पाहिजेच, कसा काय असना. न्हायी तर काय खरं न्हायी आमचं."

रखमा उठून कामाला लागली. इराला, एकदम गलबलून आले. मी काय आणि रखमा काय, फरक काहीच नाही ना . मी फक्त शिकलेल्या, आणि सुबत्ता असलेल्या घरातली अन रखमा एका झोपडतली. 

सलीलने जायचा निर्णय घेतला याबद्दल तिचे काहीच म्हणणे नव्हते. पण एकदा आपल्याशी बोलायचे तरी. उगाच विचारल्या सारखे केले पण त्याचे आधीच ठरले होते सगळे. अगदी पुढच्या 6 माहिन्याचे वेळापत्रक. माई आणी दादा, इथे राहतील , जर मी इथेच राहत असेंल तर म्हणजे मला सोबत. नाही तर मी आई कडे जावे. सुट्टी मिळाली तर अमेरीकेला. 

तिला फक्त इतकंच वाटले की रखमा ला नवऱ्यानं नोकरी सोडताना विचारात घेतले नाही आणि सलील नि आपल्याला अमेरिकेला जायच्या निर्णयात. निर्णय शेवटी त्या दोघांचा होता; पण एकदा बोललो असतो तर...

रखमा ला कुंकवाला धनी पाहिजे होता आणि तिला? तरुण वयात उगाच कशाला इतके लांब राहायचे हिने नवऱ्या पासून यात ही हाच विचार होती की. गरज सारखीच. रखमाला स्वतःच धर्म वाचवायला अन हिला स्वतःच धर्म पाळायला. इराला आता वाटत होती की धाय मोकलून रडावे का? की विसरून जावे सगळंच, जास्त विचार करूच नये. अन हे असंच असते , असे मानावे आणि शांत राहावे. 

इतक्यात तिची तंद्री परत भंगली, रखमा तिला विचारत होती,

" ताई, जादाच काम तरी करिन मी. पर तुमी बी जाणार का दादा सोबत ? मंजी मग दुसरं काम बागाय हव , सा महैन नसाल नव तुमी"

©शीतल जोशी

Saturday, 1 December 2018

Gazal

Mood for Gazals is on and words just gathered are
न उरले काही मागे आता , सूर चांदण्याचे
न स्मरती आता काही , रुणुझुणु पैंजणाचे
तुज आठवते का कधी ,
ती बकुल सुमांची माळ,जणू आठवणीचा मोहक दरवळ
तुझ्यासाठी असेल ती आता , जणू तुटल्या धाग्यांचीच अडगळ
न उरले आता काही अस्तित्व त्या माळेचे
न उरले काही मागे आता , सूर चांदण्याचे
तुज आठवते का कधी , त्या एका संध्याकाळी 
स्पंदने  दोन हृदयांची ,  जणू छेडती सप्त  सूर
अव्क्यात -व्यक्त प्रीती, अपुली अन  संध्येचे हि गूढ
वचन न मागितले मी कधी , पण तरी तू  सांगून गेलीस मजला
ना कधी एकाकी    सोडून मी निघून जाईन  तुजला
ना उरले आता काही मोल त्या तुझ्या शब्दांचे
न उरले काही मागे आता , सूर चांदण्याचे
तू त्या क्षितीज्याच्या हि पलीकडे , अन मी उभा किनाऱ्या वरी
वाट पाहतो एका लाटेची , जी नेईल मला पैलतीरी
तिथे असू आपण दोघेच , अन काळ  हि थांबला असेल
केवळ आठवणीचा सडा अन आनंदाची उधळण करेन
आता उरले केवळ काही श्वास , तुझ्या - माझ्यातील अंतराचे
न उरले काही मागे आता , सूर चांदण्याचे
-शीतल

Monday, 3 September 2018

marathipoem #मराठीकविता#कृष्ण #krishna


असे किती तरी वेळा होते
की काय चूक अन के बरोबर हेच कळत नाही
बुद्धी की मन असे द्वंद्व सुरू असते मनात
अन मी चटकन म्हणून जाते, अर्जुन झालाय माझा
अन मग वाटते की कुठे आहे माझा कृष्ण

देवघरात, एखाद्या तैलचित्रात, बासरीच्या सप्तसुरात
यमुनेच्या काठी, राधे सोबत की वाळवंटात मीरे सोबत
की रुक्मिणीच्या महाली की विदुराच्या झोपडीत

सुदम्याच्या पोह्यात, की गोवर्धन पर्वतावर
रास क्रीडेत मग्न की बालगोपलांच्या काल्यात
मथुरेत कंसमर्दन करत असेल की नवी द्वारका वसवत असेल
कृष्णाशिष्टाई करत असेल का कुरु महालात
की कृष्णेच्या अस्मितेची लढाई लढत असेल त्याच महालात

कुठे असेल हा कृष्ण सखा
कुरुक्षेत्रात, सारथी म्हणून
विश्वारूपाचे दर्शन गीते मधून सांगत
की मला सांगतोय आता इथे
की मला शोधणे इतके सोपे नाही
इतका मी चराचरात आहे
अगदी आता तुझ्या मनात सुरु असलेल्या
विचार मंथन मधे सुद्धा मीच आहे
कदाचित मी तुम्हा प्रत्येकाच्या हृदयात आहे
©शीतल

Friday, 30 March 2018

गुढी पाडवा

नव्या वर्षाचा पहिलाच सण
घेवून आला आनंदाचे क्षण
गुढी उभारता चैतन्याची
नव्या वर्षाचा उन्मेष  बहरला

चैत्र मास   दारी येता,
दाही  दिशा उजळून आल्या
रंगबेरंगी फुलांच्या  सवे ,
आसमंत सारा भरुनी गेला

चैत्रा मधले रस विविध
जणू आयुष्याचे रूपाच ते
थोडे कडू निम्बाचे  पान   अन
थोडी मधुरता साखर पारीची असते

जशी चैत्रमधली पालवी
एक नवी ओळख सृष्टीला देते
तशी एक नवी ओळख
आपली आपल्यास लाभो

नव्या वर्षाच्या प्रथम दिनी
इतका संकल्प तरी मनी  दृढ होवो

- शीतल

Thursday, 30 November 2017

#dearzindagi #loverespectyourself #hindipoetry #ज़िन्दगी Follow my writings on https://www.yourquote.in/josh_sheetal #yourquote

Sunday, 5 February 2017

एकाकी

मी एकाकी 
तू एकाकी 
कालिदींच्या तटी घुमती 
कृष्ण मुरलीचे  सूर एकाकी 

कृष्ण सखा राधेवीण अधुरा 
राधेचा सहचर अनय हि अधुरा 
राधेची हि आर्त विराणी 
अन मीरेची ती अधुरी कहाणी 

सारे असूनही सारे एकाकी 
तू एकाकी मी एकाकी 
अन कृष्ण सखायचे सूर एकाकी  

#मराठीकविता #marathikavita #marathipoem 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
खरच का हो तुमचे आणि आमचे सेम असतं?
प्रेमात पडला असाल कि तुम्ही सुद्धा कधी तरी
भले राव valentine नसेल केला सेलीब्रेट
पण तरी दिवाळीच्या पाडव्याला तरी दिली असेल कि एखादी तरी भेट
आमच्या सारखे rose days नसतील तेव्हा कॉलेजमधे
तरी सुद्धा एखादीला तरी कॉलेज ची मधुबाला मनालाच असेल कि मनामधे
पिढी एक पुढे गेली , नवीन पद्धत असते होण्या साठी व्यक्त
अहो प्रेम तर तेच असते, पण वेळ कमी म्हणून "गिफ्ट" फक्त
तुमच्याकडे बाग होती म्हणून कधी गुलाब, कधी मोगऱ्याचा गजरा असेल नजर केला
आमच्या कडे ना बाग आहे ना आहे थोडा वेळ , म्हणून आम्ही E-rose fwd केला
रोजच्या धावपळीत , नाही ती त्याला सांगत कि " काळजी वाटते तुझी"
अन रोजच्या गडबडीत, तो पण नाही नाही म्हणत " किती दगदग होते तुझी"
आठवड्यात एखादीच सुट्टी मिळाली कि घरातला पसारा दिसायला लागतो
अन आपले सुट्टीचे बनलेले प्लान फिसकटले कि आपणच आपल्या वर हसायला लागतो
मग असाच एखादा valentine आला, कि वाटते अरे आज तरी कमीत कमी
एक मेकांशी निवांत बोलायला हवं
फार काही नाही तरी आठवणी ने एक भेट कार्ड तरी लिहायला हवं
जुने झालो थोडे एकमेकांना म्हणूनच नात्यात नवे पण टिकायला पाहिजे
आणि म्हणूच सोळा वर्षाच्या वयाचा वलेन्तिने मनात जपायला पाहिजे
खरे तर प्रेमाला कशाला पहिजे वेगळे सेलिब्रशन
ट्युनिंग सेम असले कि, दोन्ही मनात सुउरू असते एकाच रेदिओ जंक्शन
तरी सुद्धा कधी तरी मन मोकळ्या गप्पा साठी थोडा वेळ कादूच
तरी सुद्धा कधी तरी आपल्या आवडीची गिफ्ट त्याच्या साठी घेवूच
कधी तरी आवडते तिला , जर स्पेशल ट्रीट केले कि
कधी तरी आवडते त्याला तिने तिचे प्रेम बोलून दाखवले कि
म्हणूनच,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
आणि रोज तेच आणि तसच असले तरी
एका खास दिवशी मात्र
तुमचे आणि आमचे सेम नसते ......?
-शीतल