धर्म
इरा किती तरी वेळ चहाचा कप हातात घेऊन उभीच होती. आज पेपर ही वाचला नाही. रविवार असल्याने सकाळही निवांतच होती. पण इराचे हे तंद्री लावून उभे राहणे वेगळं होते.
दोन दिवसांपूर्वीच सलीलचे अमेरिकेला जायचे ठरले होते. कदाचित त्याचे आधीच ठरले असेल, पण इराला आणि इतर लोकांना आता कळले होते इतकंच.
खरं तर तिने इतका विचार केलाच नव्हता काल पर्यंत. तसाही फक्त सहाच महिन्यासाठी जातोय ना, अशी एक सार्वजनिक प्रतिक्रिया होती.
माई तर लगेच म्हणाल्या " चांगले आहे की. संधी अनायासे मिळाली आहे. इराला सुट्टी मिळत असेल तर घेऊन जा. तिला ही एक नवीन देश पाहायला मिळेल.आणि आमचे काय, आम्ही तसे जाऊन येऊनच असतो."
खरं तर माई फक्त प्रतिनिधित्व करत होत्या, इतर जवळच्या व्यक्तींना पण असच वाटत होते. त्यातून ही तरुण जोडप्याने शक्यतो एकत्र राहावा असा एक विषय ही त्यात होताच. पण तसे एकमेकांच्या तोंडावर बोलणे, कोणाच्याही पचनी पडण्याच्या पालिकडच होते.इतके साधे सोपे आहे सगळे तर मग आपल्याला उगाचच असे थोडे उदास आणि तुटल्यासारखे का वाटतय?
सलीलाला संधी मिळाली हे उत्तमच आहे. आता राहता राहिला प्रश्न मी जायचे की नाही त्याचा, तर ते मलाच ठरवायचे आहे. कारण सलील याबद्दल काहीच बोलला नाही आहे. तटस्थ आहे का तो? की त्याला त्याचे मत सांगायचे नाहीये.
इतक्यात दारावरची बेल वाजली आणि इराला विचारातून बाहेर पडणे भाग पडले . रखमाच असेल या वेळी.
शनिवार - रविवारच रखमाची आणि इराची भेट व्हायची. काम करता करता गप्पा पण व्हायच्या. रखमा ने खचितच चार पावसाळे अधिक पाहिले होते इरापेक्षा. ती ज्या वातावरणात जगात होती तेही खूप भिन्न होते, इराच्या घरापेक्षा , कुटुंबापेक्षा. पण दोघी ही मस्त गप्पा मारायच्या.
"काय ताई अजून चहाच का ? रविवार हाय म्हणून काय झाले, आवरा की चटचटा"
"हो बाई, उशीरच झाला बघ. तू घेशील का चहा घोटभर. ताजाच करते दोघी साठी"
असे म्हणून इरानी आदण ठेवले सुद्धा. राखमाला उगाचच मनात आले, कशाला हवा ताजा चहा, उगाच कशाला वाया घालवायचे दूध, चहा , साखर.
"इरा ताई, तोच च्या गरम करून घेवू की घोटघोट भर."
"काही नको, एक कप चहानी काही माझी इस्टेट वाया जात नाहीये. तू पण आता माई आणिआई सारखे नको बाई सांगू."
इरा ऐकणार थोडीच होती.
चहा पिता पिता, रखमा म्हणाली,
"ताई, मधे माई म्हणत व्ह्यता की जादाच काम हाय काई तरी.काई असलं तर सांगा की करून देईन. वाईच पैशाची पन नड आलिया."
"अग हो, आहे खरे थोडे साफ सफाईचे काम. करून देशील का तुझ्या सवडीने. आणि रोज तासभर जादा काढशील तर बारीक सारीक कामात मदतच होईल मला. ठरवू आपण आजच. पैसे हवे असले तर सांग देईन की मी तुला. पगारातून वळते होतील. पण काय ग, काय झाले अचानक, पोरं बाळ बरी आहेत ना"
इराला आता उगाच आठवले , सलीलचे असे म्हणणे होते की इराला व्यवहार काही कळत नाही आणि म्हणून लोक तिच्या डोक्यावर बसतात.
रखमा बोलत होती,
"काय सांगायचं इरा ताई. आमच काय एक संपल की दुसरं. आता त्यो माझा नवरा , महिन्याला सात आठ हजार रुपये मिळवायचा. पाच तरी खर्चाला उपेगाला यायचं. 10 दिस झाले घरीच बसून हाय. असच इक दिस काम सोडून आला. अन बसलाय आता घरी. काम धंदा बी शोधना. निस्ता बसून हाय. बरं काम सोडणार तर मला काय सांगितलं बी न्हाय. आला असंच सोडून . तरी एक हाय की दारू पिणं जरा कमी हाय. मदी एकदा पोलिसाने धरून नेला व्हता , त्या वकती मी त्याला आणलाच नाय माघारी, राहिना म्हटल महिनाभर तितच जेलमदी. त्या दिसापसने जरा बर हाय बगा. काय करायचं ताई, आमच्या लोकात हे असंच चालतय बगा, सगळं बायांनीच करायचं. पर कुंकवाला धनी पाहिजेच, कसा काय असना. न्हायी तर काय खरं न्हायी आमचं."
रखमा उठून कामाला लागली. इराला, एकदम गलबलून आले. मी काय आणि रखमा काय, फरक काहीच नाही ना . मी फक्त शिकलेल्या, आणि सुबत्ता असलेल्या घरातली अन रखमा एका झोपडतली.
सलीलने जायचा निर्णय घेतला याबद्दल तिचे काहीच म्हणणे नव्हते. पण एकदा आपल्याशी बोलायचे तरी. उगाच विचारल्या सारखे केले पण त्याचे आधीच ठरले होते सगळे. अगदी पुढच्या 6 माहिन्याचे वेळापत्रक. माई आणी दादा, इथे राहतील , जर मी इथेच राहत असेंल तर म्हणजे मला सोबत. नाही तर मी आई कडे जावे. सुट्टी मिळाली तर अमेरीकेला.
तिला फक्त इतकंच वाटले की रखमा ला नवऱ्यानं नोकरी सोडताना विचारात घेतले नाही आणि सलील नि आपल्याला अमेरिकेला जायच्या निर्णयात. निर्णय शेवटी त्या दोघांचा होता; पण एकदा बोललो असतो तर...
रखमा ला कुंकवाला धनी पाहिजे होता आणि तिला? तरुण वयात उगाच कशाला इतके लांब राहायचे हिने नवऱ्या पासून यात ही हाच विचार होती की. गरज सारखीच. रखमाला स्वतःच धर्म वाचवायला अन हिला स्वतःच धर्म पाळायला. इराला आता वाटत होती की धाय मोकलून रडावे का? की विसरून जावे सगळंच, जास्त विचार करूच नये. अन हे असंच असते , असे मानावे आणि शांत राहावे.
इतक्यात तिची तंद्री परत भंगली, रखमा तिला विचारत होती,
" ताई, जादाच काम तरी करिन मी. पर तुमी बी जाणार का दादा सोबत ? मंजी मग दुसरं काम बागाय हव , सा महैन नसाल नव तुमी"
©शीतल जोशी
No comments:
Post a Comment